पुण्यात रोज जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या विषाणूचे पुण्यात आतापर्यंत 127 संशयित रुग्ण आढळले आहेत. तर दोन संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे शहरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुणे विभागात दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे पुण्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि काल जीबीएसमुळे दुसरा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात राहात असलेल्या 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही मृत महिला कॅन्सरग्रस्त होती. तसंच 15 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
यापैकी 72 रुग्णांची निदान निश्चिती देखील झाली आहे. यापैकी 23 रुग्ण पुणे मनपा तसंच 73 रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामधील आहेत. तर 13 रुग्ण पिपंरी चिंचवड मनपा तसंच 9 रुग्ण पुणे ग्रामीण आणि 9 इतर जिल्ह्यातील रुग्ण आहेत. तर यापैकी 20 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.

आजाराची लक्षणं
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा संसर्गजन्य रोग आहे आणि सामान्यतः व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गानंतर होतो.
रुग्णाला दोन आठवड्यांच्या आत श्वसन (ताप, खोकला, नाक वाहणं) किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनची (पोटदुखी, अतिसार) लक्षणं दिसतात. पाय आणि हातांमध्ये कमकुवतपणा हे देखील जीबीएसचं मुख्य लक्षण आहे.
विशेषत: पोल्ट्री, आणि दूषित किंवा कमी शिजवलेलं मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा उपचार न केलेल्या पाण्याच्या सेवनाने मानवामध्ये हा जीवाणू प्रसारित होतो.
अतिसार, पोटात दुखणं, ताप, मळमळ आणि उलट्या ही लक्षणं आहेत. आजाराच्या २ ते ५ दिवसांनी लक्षणं दिसतात आणि जवळपास एक आठवडा राहतात.
अशी घ्या काळजी
नागरिकांनी पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी उकळून प्यावे.
अन्न स्वच्छ आणि ताजे असावे, शिळे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये
वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
घाबरून न जाता कोणतीही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा