आज (दि. 26) महाशिवरात्रीनिमित्त सगळ्याच शिव मंदिरात भाविकांची गर्दी आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची पहाटेपासून खूप गर्दी आहे. या मंदिरात महाशिवरात्रीला शंकराचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून लोकांनी गर्दी केली. घृष्णेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पण दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं. रांगेत उभ्या असलेल्या तरुणांची हाणामारी झाली. भाविकांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनाच्या रांगेमध्ये दर्शनासाठी पुढे जाण्यावरुन भाविकांमध्ये हाणामारी झाली. व्हिआयपी दर्शन रांगेतून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे त्यांच्या कुटुंबासोबत जात होते. त्यावेळी सगळ्यांसाठीच्या रांगेत उभे असलेले काही जण बॅरिगेट्स ओलांडून दानवेंच्या मागे गेले. हा सगळा गोंधळ बघितल्यानंतर दानवे परत गेले. ते काही वेळ बाहेर थांबले. प्रशासन आणि पोलिसांमधल्या समन्वयाचा अभाव यावेळी दिसून आला. दानवेंनीही याविषयी नाराजी व्यक्त केली.
दिवसभरात भाविकांची गर्दी आणखी वाढेल. त्यामुळे चांगली व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना दानवे यांनी केली.