महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेला पात्र महिलांना मे महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी यासंदर्भात माहिती दिली.
मात्र लाडक्या बहिणींसाठीच्या निधीसाठी सरकारची दमछाक होताना दिसतेय. लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीला पुन्हा कात्री लावण्यात आली आहे. अनुसुचित जाती घटकांसाठीचा ४१०. ३० कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आदिवासी विभागाचा ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळवण्यात आला आहे. आतापर्यंत इतर विभागांचा १ हजार १५६.३ कोटींचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवला आहे. लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यासाठी सरकारकडून इतर विभागांच्या निधीला कात्री लावण्यात येत आहे.