नागपूर: लव्ह जिहाद विरोधात कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयात ही घोषणा करण्यात आली असून समितीचे सदस्य कोण असतील, त्याची कार्यपद्धती कशी असेल? याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याचे कारण आणि या कायद्याची गरज का आहे? याबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच लव्ह जिहाद विरोधात महायुती सरकार कडक कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, लव्ह जिहादची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आली आहे. केरळ उच्च न्यायालयानेही याचा उल्लेख केला आहे. एका धर्मातील व्यक्तीने दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यात गैर काही नाही. पण खोटे बोलून, खोटी ओळख तयार करून, फसवणूक करून लग्न करायचे आणि मुले जन्माला घालून सोडून द्यायचे, ही प्रवृत्ती समाजात पसरत आहे. जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे योग्य नाही. त्यामुळे यासंदर्भात जी काही कार्यवाही असेल ती राज्य सरकारकडून केली जाईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.