काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट औरंगजेबाशी केली आहे. मात्र त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. “औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत”, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सपकाळ यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
“औरंगजेब हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने स्वत:च्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. तसेच औरंगजेब हा नेहमी धर्माचा आधार घ्यायचा. औरंगजेब हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीस हे देखील तेवढेच क्रूर आहेत. ते देखील कायम धर्माचा आधार घेतात. त्यामुळे दुर्देवाने औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा सारखाच आहे”, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे.
यावेळी त्यांनी महायुती सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या सत्तेत तर टोळ्या एकत्र येऊन सरकार स्थापन झालं आहे. या टोळ्या एकत्र आल्यामुळे सरकारच्या मंत्र्यांमध्ये बेबनाव, अहंकाराचा खेळ सुरू असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ नावाचा एक चित्रपट आला होता. तो चित्रपट जसा होता, तसं महाराष्ट्रातील सत्तेत ‘गँग्स ऑफ सरकार’ असा खेळ सुरु आहे. मानापमान आणि अहंकाराचाही खेळ सुरु आहे. या सर्वाची किंमत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चुकवावी लागत आहे”.