उन्हाळ्यामध्ये आवर्जून खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये काकडीचा आवर्जून समावेश होतो. कलिंगड, आंबा याबरोबरच काकडी खाण्याचं प्रमाणही उन्हाळ्यामध्ये वाढल्याचं दिसून येतं. डिहायड्रेशन टाळण्यासाठी आणि पोटभरीचं म्हणून काकडी हा अगदी स्वस्तात मस्त पर्याय आहे. मात्र अनेकदा आपण एखादी गोष्ट खाताना ती साळून खातो. काकडीही साळून खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मात्र यामुळेच काकडी साळून खाणं चांगलं की सालासकट यावरुन बऱ्याचदा एकाच घरात दुमत असलेलं दिसतं.
आपण अनेक फळं आणि भाज्या साळून खातो. मात्र त्यामुळे या भाज्यांमधील महत्त्वाचे घटक आपण या सालांसकट गमावतो. असाच काहीसा प्रकार काकडीबाबत होतो असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. काकडीमध्ये फायबर, पोषक तत्वं आणि अँटीऑक्सीडंट मोठ्या प्रमाणात असतात. मात्र यापैकी बहुतांश घटक हे काकडी सालून खाल्ल्यास शरीरात पोहचत नाही. ‘वेबएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, काकडी न साळता खाल्ल्यास अधिक पोषक तत्वं शरीराला मिळून त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. अर्थात काकडी न साळता खाणार असाल तर ती खाण्याआधी स्वच्छ धुवून घेणं आवश्यक असतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.