राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णता वाढताना दिसत आहे. यादरम्यान भारतीय हवामान विभागाने ९ आणि १० मार्च रोजी मुंबई, ठाणे आणि रायगडमधील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबई शहरात सध्या दिवसाच्या वेळी तापमान चांगलेच वाढताना दिसत आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबईला यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाची ही स्थिती जवळपास शुक्रवार पर्यंत अशीच राहण्याची शक्यता आहे. तसेच येत्या शनिवार-रविवारसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ९ आणि १० मार्च या काळात तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या डेटानुसार शहरात दिवसा तापमान वाढत आहे, मात्र रात्री तुलनेने तापमान कमी झाल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी सकाळी उपनगर भागात किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले जे सामान्य तापमानापेक्षा १ अंश सेल्सिअसने कमी होते.