अंगाची लाहीलाही करणाऱ्या तीव्र उकाड्यानंतर तासगाव, वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात गारपीटीसह झालेल्या पावसाने अंतिम टप्प्यात असणाऱ्या द्राक्ष हंगामावर संकट उभे ठाकले आहे.
सांगलीत बुधवारी सकाळपासून ढगाळ हवामान होते. यामुळे तापमान 36 अंश सेल्सिअस असताना 40 अंश भासत होते. हवेतील आर्द्रता 40 टक्के असताना सायंकाळी ढगांची आकाशात गर्दी होऊन पूर्वेकडील वाऱ्यासोबत पावसाचे आगमन झाले. तालुक्यातील काही भागांत वाळवा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाल्याचेही नुकसान झाले. तासगाव तालुक्यातील द्राक्ष हंगाम आता अंतिम टप्प्यात असून, काही बागांमध्ये तयार द्राक्षे आहेत. मणेराजुरी परिसरात गारपीट झाल्याने तयार मालातील मणी तडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
कराड, कोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी सरी बरसल्या. त्यामुळे वाळवणासाठी ठेवलेली ज्वारी, हरभरा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मालेगावात अवकाळी पाऊस
मालेगाव तालुक्यात 15 मार्चपासून तापमानाचा पारा झपाट्याने वाढला असून, मार्च महिन्यातच पारा 38 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिकांना उष्णतेचा फटका बसू लागला. उष्णतेचा सामना करणाऱ्या मालेगाव तालुक्यात बुधवारी दुपारी पावसाने अचानक हजेरी लावली. शहरासह तालुक्यातील काही भागांत तुरळक पाऊस पडला. मात्र, या पावसाने अपेक्षित गारवा मिळण्याऐवजी वातावरण आणखी उष्ण झाले.