भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं अनेकांना आकर्षण असतं. आजपर्यंत अनेकांचं स्वप्न मायानगरी मुंबईने पूर्ण केलंय. स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत स्वतःच हक्काचं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. मायानगरीत स्वतःचे घर घेणे आव्हानात्मक झाले आहे. तुलनेत 2024 या वर्षात मुंबई महानगर क्षेत्रातील घरांच्या किंमतीत तब्बल 18 टक्के वाढ झाली आहे.
सर्वाधिक म्हणजे तब्बल 49 टक्के वाढ ही दिल्लीतील मालमत्तेच्या किंमतीत झाली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ही आकडेवारी प्रॉपटायगर डॉटकॉमच्या ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल ॲन्युअल राऊंडअप 2024’ या अहवालातून समोर आली आहे.
घरांच्या किमतीत वाढ होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. बांधकामाच्या क्षेत्राशी संबंधित साहित्याच्या वाढत्या किंमती, कामगारांची वाढती मजुरी आणि शहरातील गगनचुंबी इमारतीतील प्रशस्त घरांसाठी असलेली मोठी मागणी, या सर्व बाबी देशातील प्रमुख शहरांतील मालमत्तेच्या किंमतीत वाढ होण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.