आधार कार्ड हे एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे. भारतात सरकारी, बँकिंग संबंधित कोणत्याही कामासाठी आधार कार्ड गरजेचं आहे. ओळखीचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड. अनेक महत्वाच्या ठिकाणी आपण आधार कार्ड देतो. हल्ली आधार कार्ड माहितीचा गैरवापर केला जातो आणि अनेक जण त्याचे बळी ठरतात. आधार कार्डच्या माहितीच्या आधारे फसवणुकीचे प्रकार वारंवार घडतात. पण ही फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये असलेले बायोमेट्रिक तपशील लॉक करु शकता. याबद्दल प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. आधार कार्डमध्ये असलेले बायोमेट्रिक तपशील कसे लॉक करायचे समजून घेऊया.
आधार कार्ड लॉकिंग
आधार कार्डच्या बायोमेट्रिक तपशिलात फिंगरप्रिंट, आयरीस स्कॅन आणि फेस डेटा सारखी महत्त्वाची माहिती असते. एकदा हे तपशील लॉक झाल्यानंतर तुमच्या परवानगीशिवाय कोणीही आयडी पडताळणी, आर्थिक व्यवहार किंवा सिम कार्ड जारी करू शकणार नाही. त्यामुळे फसवणुकीपासून तुम्ही वाचाल. आधार कार्ड बायोमेट्रिक तपशील लॉक करण्यासाठी काही महत्वाच्या स्टेप्स आहेत, त्या जाणून घेऊया.
आधार कार्ड लॉक करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम बायोमेट्रिक लॉकसाठी UIDAI myAadhaar पोर्टलला भेट द्या.
आता खालील ‘लॉक/अनलॉक आधार’ या पर्यायावर क्लिक करा.
प्रथम ‘VID जनरेट करण्यासाठी येथे क्लिक करा’ वर क्लिक करून व्हर्च्युअल आयडी जनरेट करा.
एकदा व्हर्च्युअल आयडी तयार झाला की, पुन्हा त्याच पेजवर या.
आता ‘पुढील’ पर्यायावर क्लिक करा. येथे लॉक आधार निवडा आणि आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
आता Send OTP वर क्लिक करून OTP पडताळणी करा.
पडताळणीनंतर तुमचे आधार बायोमेट्रिक लॉक केले जाईल.
एसएमएसद्वारेही बायोमेट्रिक्स लॉक करण्याची सुविधा
आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरून 1947 वर [GETOTP (स्पेस) आधार शेवटचे 4 अंक] मेसेज पाठवा.
जर तुमचा फोन नंबर अनेक आधार क्रमांकांशी जोडलेला असेल, तर शेवटचे 4 ऐवजी शेवटचे 8 अंक वापरा.
एसएमएसद्वारे ओटीपी पडताळणी करा.
यामुळे तुमचे बायोमेट्रिक लॉक होईल.