आपला चेहरा स्वच्छ, सुंदर असावा असं प्रत्येकाला वाटतं. पण हल्ली बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायमाचा अभाव, वाढतं प्रदूषण यामुळे अनेकदा त्याचा परिणाम चेहऱ्यावर होतो. चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स येतात. हे डाग निघून जावे यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. अनेक जण त्यासाठी महागड्या ट्रीटमेंट घेतात. पण आपल्या घरात असलेल्या रोजच्या वापरातल्या काही गोष्टींनी चेहऱ्यावरचे डाग आपण घालवू शकतो. बाहेरच्या केमिकल्समुळे अनेकदा चेहऱ्यावर उलट परिणाम होतो. घरगुती उपाय केले तर चेहरा स्वच्छ होईल आणि काळे डाग निघून जातील.

घरगुती उपाय कोणते आहेत पाहुयात
टोमॅटो
अनेकदा जास्त वेळ उन्हात राहिल्याने चेहऱ्यावर काळे डाग पडतात. टोमॅटो हा आपल्या घरात साधारण रोज वापरला जाणारा पदार्थ. अशावेळी हे काळे डाग घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. हे सर्व घटक त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. टोमॅटो कापून त्यातील लगदा बाहेर काढून या लगद्याने चेहऱ्यावर मसाज करावा. शेवटी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. आठ्वड्यातून ३ ते ४ वेळा याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते.
लिंबाचा रस
लिंबू हे चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी उत्तम आहे. लिंबाचा रस ज्या ठिकाणी काळे डाग आहेत तिथे लावू शकता. अलोव्हेरा जेल, लिंबाचा रस आणि थोडी हळद असं मिश्रण ही उत्तम आहे.
अलोव्हेरा जेल
चेहऱ्यासाठी अलोव्हेरा जेल उत्तम आहे. रात्री झोपण्यापूर्वी प्रभावित जागेवर तुम्ही हे जेल लावू शकता. यामुळे काही दिवसात काळे डाग कमी होण्यास मदत होईल.

हळदीचा फेसपॅक :
हळदीमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सीडंट आणि अँटीसेप्टिक गुण असतात. हळद पावडर, बेसन आणि दुधाची पेस्ट बनवून ती चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर कोमट पाणी वापरून धुवा. यामुळे त्वचेचा रंग सुधारतो.

योग्य आहार
आपला आहार चुकीचा असेल तर त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फळे, भाज्या आणि अँटीऑक्सीडंटयुक्त आहार घ्यावा. योग्य प्रमाणात पाणी प्यावं. त्यामुळे त्वचा निरोगी राहते. शरीरातील आर्द्रता कायम राहते आणि काळे डाग कमी होण्यास मदत होते.
हे घरगुती उपाय करून समस्या दूर करू शकता पण डाग अधिक असतील तर त्वचारोग तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.