हवामान विभागाने राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस कोसळत आहे, कडक उन्हाळ्यात पाऊस आल्याने काही ठिकाणी थंडावा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस झाल्याने व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पुन्हा एकदा राज्याला अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने राज्यातील 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. गेले तीन ते चार दिवस पुण्यात देखील ढगाळ हवामान दिसून येत होते. अखेर काल पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
आंबा, काजू बागांना फटका
पुढील दोन ते तीन दिवस कोकणात अवकाळी पाऊस पहायला मिळणार आहे. कोकण विभगाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी तयार झालेले आंबे झाडावरून तुटून गेले आहेत. लहान लहान कैरी देखील गळून पडल्या आहेत. ढगाळ आणि पावसाळी वातावरण झाल्याने आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे.