छत्तीसगडमधील बस्तर भागात गुरुवारी झालेल्या दोन चकमकीत एक जवान आणि २२ माओवादी ठार झाले. दंतेवाडा सीमेजवळील विजापूर जिल्ह्यातील गंगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात माओवादी असल्याची माहिती मिळाली होती. याआधारे सुरक्षा दलांनी सकाळी ७ वाजता कारवाई सुरू केली तेव्हा पहिली चकमक झाली.
बस्तर रेंजचे आयजीपी सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दांतेवाडाच्या सीमेजवळ बिजापूर जिल्हातील गंगालूर ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जंगल परिसरात माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सुरक्षा दलाच्या शोधमोहिमदरम्यान सकाळी सात वाजता चकमक सुरू झाली. अनेक तास अधूनमधून गोळीबार सुरू होता. गोळीबारात विजापूर जिल्हा रिझर्व्ह गार्डचा (डीआरजी) एक जवान शहीद झाला आहे. १८ माओवादी मारले गेले आहेत. आम्ही स्फोटके आणि शस्त्रे जप्त केली आहेत. शोध मोहीम सुरू आहे.
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत नारायणपूर जिल्ह्यातील अबुझामदच्या जंगलात सुरक्षा दलाकडून कारवाई केली जात असताना पहाटे ३ वाजता काही बंडखोरांनी आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटामुळे एक जवान आणि एका अधिकार्याच्या डोळ्यात धूळ गेली. दोघांनाही बाहेर काढण्यात आले आणि ते सुरक्षित आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ही मोहिम अजूनही सुरू असल्याचे सांगितले आहे.