पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. तसंच अटारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय भारतात पाकिस्तानी नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक पार पडली. यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.
“सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची (CCS) आज संध्याकाळी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सीसीएसला २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आली, ज्यामध्ये २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिक ठार झाला होता. इतर अनेक जण जखमी झाले होते. सीसीएसने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि पीडितांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली. दहशतवादासाठी शून्य सहनशीलता आहे,” असं विक्रम मिस्त्री म्हणाले.