पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होत आहेत. तब्बल ३ दशकांनंतर पाकिस्तानाला आयसीसी स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे. एकीकडे क्रिकेट मॅचची चर्चा असताना दुसरीकडे मात्र बॉम्ब स्फोटानं संपूर्ण देश हादरला आहे. खैबर पख्तूनख्वाचे पोलीस महानिरीक्षक जुल्फिकार हमीद यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोरा खट्टकमधील दारुल उलूम हक्कानिया मशिदीत स्फोट झाला आहे. त्यात पाच जण मारले गेले असून २० जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारी नमाज सुरु असताना आत्मघाती स्फोट घडवण्यात आला. नमाजावेळी मशिदीत मोठी गर्दी होती. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बॉम्ब स्फोटाची घटना घडल्यानंतर पेशावरमधील लेडी रीडिंग रुग्णालयाला अलर्ट देण्यात आला आहे. हे रुग्णालय स्फोट झालेल्या मशिदीपासून ४५ मिनिटांवर आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

आत्मघाती बॉम्ब स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक जुल्फिकार हमीद यांनी दिली. स्फोट झालेल्या ठिकाणी सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. आसपासच्या भागांमध्ये झडती घेतली जात आहे. फॉरेन्सिकचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.
जिओ-न्यूजनुसार, जमियत उलेमा-ए-इस्लाम समीउल हक (जेयूआय-एस) नेते मौलाना हमीद उल हक, जे मदरशाचे नायब मौलाना आहेत, ते स्फोटाच्या वेळी मशिदीत होते. त्यात जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रमजानपूर्वीची ही शेवटची शुक्रवारची नमाज होती. त्यामुळे मशिदीत मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. पण या बॉम्बस्फोटने खेळाडूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.