अमेरिकेच्या ‘अरे’ला इराणचं ‘कारे’, युद्ध भडकण्याची शक्यता

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला होता. येत्या काही दिवसांत अमेरिकेबरोबर अणू करार करा अन्यथा बॉम्बहल्ले आणि शुल्कवाढीला सामोरे जा असा कठोर दम ट्रम्प यांनी इराणला भरला होता. मात्र, इराणने ट्रम्प यांच्या धमकीला जुमानलेलं नाही. उलट इराणी सैन्याने त्यांच्या देशावर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी क्षेपणास्त्रे सज्ज केली आहेत. तेहरान टाइम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

इराणी सैन्याने देशभरात भूमिगत तळ बनवून तिथे ठेवलेली क्षेपणास्त्रे प्रक्षेपणासाठी सज्ज केली आहेत. हे भूमिगत तळ देशावरील कोणत्याही मोठ्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तयार केले आहेत. दुसऱ्या बाजूला इराणच्या सर्वोच्च नेत्यानेही बदला घेण्याची धमकी दिली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खोमेनेई यांनी ट्रम्प यांच्या धमकीला सोमवारी उत्तर दिलं. ते म्हणाले, आमेरिकेने बॉम्ब हल्ले केले तर त्यांना तितक्याच मोठ्या बॉम्ब वर्षावाला, प्रत्युत्तराला सामोरं जावं लागेल. आमचं पूर्वीपासूनच अमेरिका व इस्रायलशी शत्रुत्व आहे. ते केवळ हल्ल्याची धमकी देतात. परंतु, अशा हल्ल्याची आम्हाला शक्यता वाटत नाही. तरीदेखील त्यांना असा काही प्रयत्न केला, खोडसाळपणा केलाच तर नक्कीच त्यांना चोख प्रत्युत्तर मिळले. अमेरिकेने अनेकदा इराणमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी तसा प्रयत्न केला तर इराणी जनता स्वतः त्यास सामोरी जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here