जया बच्चन यांची महाकुंभवर टीका… चेंगराचेंगरीनंतर अनेक मृतदेह पाण्यात फेकल्याचा आरोप

ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन यांनी महाकुंभमेळ्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रयागराजमधल्या संगमाचं पाणी प्रदूषित असल्याचा दावा करत त्यांनी चेंगराचेंगरीतील मृतांचे मृतदेह नदीत फेकण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. यामुळे नदीचं पाणी आणखी दूषित झाल्याचं त्यांनी म्हटलंय. या सर्व मुद्द्यांवर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. यावर माध्यमांनी आवाज उठवला पाहिजे, असे जया बच्चन म्हणाल्या. संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

महाकुंभमेळ्याच्या आयोजनावरून ही त्यांनी टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सामान्य लोकांसाठी कोणतीही विशेष व्यवस्था करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, कुंभमेळ्यात सामान्य लोकांना कोणतीही विशेष वागणूक मिळत नाही. त्यांच्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. दुसरीकडे व्हीआयपी कुंभात जाऊन स्नान करतात, त्यांना विशेष वागणूक मिळते. दुसरे म्हणजे, सरकार खोटे बोलत आहे की कोट्यवधी लोक कुंभमेळ्याला पोहोचले आहेत. मला सांगा, इतके कोटी लोक तिथे येतील हे कसे शक्य आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांच्या या वक्तव्यानंतर सिनेक्षेत्रातून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. प्रसिद्ध गायक सोनू निगमने जया बच्चन यांच्या या वक्तव्यावर उपरोधिक टीका केली आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर जया यांचा व्हिडीओ शेअर करत सोनूने चक्क त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. जया बच्चन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी काहींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here