सांगलीतील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील 35 वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सरकारकडे हर्षल पाटील यांचे जलजीवन मिशन योजनांच्या कामांचे 1 कोटी 40 लाखांची बिले थकीत होती. सावकार आणि इतर लोकांकडून त्यांनी कामासाठी 65 लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्यामुळे ही लोकं पैशांसाठी पाटील यांच्याकडे सतत तगादा लावून त्यांचा मानसिक छळ करत होती. एकीकडे सरकारकडून पैसे मिळत नव्हते आणि दुसरीकडे सावकाराचा तगादा त्यामुळे हर्षल यांनी आत्महत्या केली.
या घटनेनंतर सरकारवर टीकेची झोड उठली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या पोस्टनंतर एका अजून कंत्राटदाराने धक्कादायक विधान केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टवर एका तरुण कंत्राटदाराने आव्हाड यांना मेसेज केला की, ‘आपली ही पोस्ट बघितली आणि पुढचा नंबर माझा असेल का असे वाटत आहे. मी सुद्धा सरकारी कामं केली आहेत. माझी देखील अनेक बिलं थकीत आहेत, असा मेसेज तरुणाने केला आहे.
याचा स्क्रीनशॉट आव्हाड यांनी शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.