सध्या बोरिवली ते विरार पाचवी-सहावी मार्गिका आणि कल्याण ते कसारा दरम्यान तिसऱ्या मार्गिकाचे काम सुरू आहे. आता या प्रकल्पाचा आणखी एक टप्पा पुढे सरकणार आहे, या दोन्ही मार्गिकांच्या कामासाठी २९.३२ हेक्टर वनजमिनींवरील झाडे तोडण्यास मंजुरी मिळाल्याने या मार्गिकाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास जलद होणार आहे.
मध्य रेल्वेवरील कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील १७ गावांतील १६.५४ हेक्टर जमिनीवरील झाडे कापली जाणार आहेत. ठाण्यातील मुख्य वन संरक्षकांनी सशर्त काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ५ डिसेंबर २०२५ पर्यंत ही परवानगी वैध असेल. वनक्षेत्रात काम करताना नैसर्गिक जलस्रोतांचे प्रवाह बंद होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना वन विभागाने मध्य रेल्वेला केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला हा प्रकल्प अखेर रूळांवर येणार आहे. या प्रकल्पासाठी ७९२ कोटी खर्च येण्याची शक्यता आहे.