कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आली आहे. रविवारी आपल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासात दिसून आलं आहे की ओम प्रकाश यांचं त्यांनी पत्नी पल्लवीसह कुटुंबातील एका सदस्याला हस्तांतरित केलेल्या काही स्थावर मालमत्तेवरून वाद झाला होता. त्यानंतर पत्नीने आधी त्यांच्यावर मिरची पावडर फेकली आणि बांधून ठेवत हत्या केली.
६८ वर्षीय पोलीस आयुक्तांची हत्या करण्यासाठी ग्लास बॉटलचाही वापर करण्यात आला. हत्या केल्यानंतर पल्लवीने आपल्या शेजाऱ्याला फोन केला आणि हत्या केल्याची कबुली दिली असं समजत आहे. मी राक्षसाला ठार केलं आहे असं तिने व्हिडीओ कॉल करुन सांगितलं. पोलीस ओम प्रकाश यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी तातडीने पल्लवी आणि त्या जोडप्याच्या मुलीला ताब्यात घेतलं.
पल्लवी आणि मुलगी कृती यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत ओम प्रकाश यांच्यावर दोन चाकूंनी वार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेय याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने म्हटलं आहे की त्याची आई आणि बहीण दोघीही नैराश्याने ग्रस्त आहेत आणि त्यांनी यापूर्वी त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमक्यांनंतर, ओम प्रकाश त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. परंतु मुलीने 48 तासांपूर्वीच त्यांना परत घऱी आणलं होतं.