जास्त काळ लघवी रोखून धरणे म्हणजे आजारांना निमंत्रण, जाणून घ्या सविस्तर

लघवी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. परंतु, जास्त वेळा किंवा कमी वेळा लघवीला जाणे, दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी योग्य नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. जास्त वेळ लघवी रोखून ठेवणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे मूत्ररोगतज्ज्ञ सांगतात.

लघवी रोखल्याने मूत्रमार्गाचे संक्रमण, तसेच मूत्राशय आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटरमधील प्राध्यापक स्टीफन फ्रीडलँड यांनी २०२१ मध्ये ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला सांगितले होते की, जर कोणी वारंवार लघवी रोखून ठेवत असेल आणि मूत्राशय अधिक काळ भरलेले राहत असेल, तर संबंधित अवयवावर जास्त ताण येऊ शकते आणि काही काळानंतर त्या अवयवाची कार्यक्षमता कमी होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला आराम मिळेपर्यंत मूत्राशयात लघवी साठवण्याची क्षमता असते.

प्रौढ व्यक्तींच्या मूत्राशयात जवळजवळ एक ते दोन कप लघवी साठवण्याची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त लघवी साठवली गेल्यास त्या अवयावर ताण येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला शरीरात इतकी लघवी तयार करण्यासाठी नऊ ते १० तासांचा कालावधी लागतो, असे हेल्थलाइनमध्ये नमूद करण्यात आले आहे. पेल्विक सर्जन डॉ. रेना मलिक ‘द गार्डियन’शी बोलताना म्हणाल्या की, एखाद्या व्यक्तीने जास्त काळ शरीरात लघवी साठवून ठेवल्यास, ती बाब जीवाणूंसाठी कारणीभूत ठरते.

अनेकदा लघवी आलीय हे ठाऊक असूनदेखील अनेक जण लघवीला जाणे टाळतात. त्यामुळे पेल्विक फ्लोर स्नायूंना हानी पोहोचू शकते आणि मूत्रमार्गातील स्नायूंच्या संयमावर याचा परिणाम होऊ शकतो. सवयीचा भाग म्हणून जे लोक वेळेत लघवीला जाणे टाळतात, त्यांना वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते, कधीतरी लघवी करतानादेखील त्रास होऊ शकतो.

प्रत्येक व्यक्तीनुसार लघवीला जाण्याची वेळ बदलते. तज्ज्ञ सांगतात की, प्रौढांनी जागे असताना दर तीन ते चार तासांनी लघवी करावी. परंतु, ही बाब तुम्ही किती आणि किती वेळा पाणी पित आहात किंवा खात आहात किंवा गर्भवती आहात यावर अवलंबून असते आणि त्यानुसार बदलते. मद्यपान, कॉफी व चहासारखी कॅफिनयुक्त पेये, तसेच कार्बोनेटेड पेयांच्या सेवनाने लघवीला जाण्याची तीव्रता आणि प्रमाण दोन्ही वाढते. झोपेच्या पूर्वी या पदार्थांचे सेवन टाळल्यास आरोग्यासाठी ते हितकारक ठरू शकते आणि मग झोपेत असताना वारंवार लघवीसाठी जाग येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here