सगळी सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे या योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना २१०० रुपयांच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चिन्ह आहे.
अर्थसंकल्पातील वित्त, नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना २१०० रुपयांची मदत कधी करणार, अशी विचारणा सदस्यांनी केली होती. त्यावर सध्या लाडक्या बहिणींना १५०० रुपयांची मदत देत आहोत. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावरच वाढीव मदत दिली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.