विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 10 मार्चपासून अर्जाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजपसह शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.
27 मार्चला या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात, भाजपच्या 3 आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या खात्यात प्रत्येकी एक-एक जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
भाजपकडून तीन नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून तीन उमेदवार परिषदेच्या रिंगणात असणार आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्र भाजपकडून दिल्लीसाठी दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या तीन निष्ठावंत नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या तीन नेत्यांची नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून पक्षात सध्या झिशान सिद्धकी, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार, संजय दौंड आणि सुबोध मोहिते इच्छुक आहेत. मात्र, एकच जागा राष्ट्रवादीची असल्याने कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.