खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये आंदोलनानंतर दंगल झाली. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता एनआयएची(NIA) टीम छत्रपती संभाजी नगर शहरात दाखल झाली आहे. कबर असलेल्या खुलताबाद शहरासह मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, बीड, उदगीर या ठिकाणी देखील एनआयएच बारीक लक्ष असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी नगरच्या खुलताबाद येथे आहे. ही कबर काढून टाकण्यात यावी अशी मागणी महायुतीतील घटक पक्षांसह विविध हिंदुत्ववादी पक्ष संघटनांनी केली आहे. यानंतर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने अल्टिमेटम देत महाराष्ट्रामध्ये आंदोलनं केली. यात नागपूर येथे आंदोलनानंतर रात्री दंगल उसळली. या पार्श्वभूमीवर एनआयएची टीम मराठवाड्यामध्ये विशेष लक्ष देत असताना ज्या जिल्ह्यांना दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी संशयित व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष देत आहे. या परिसरामध्ये तपास यंत्रणांचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
२० दिवसांपासून औरंगजेब कबरीवरून वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील कबर हटवण्यासाठी आंदाेलने सुरू आहेत. नागपुरात याच कारणाने दंगल झाली. परभणी, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरातही तणावपूर्ण शांतता आहे. या शहरांना दंगलीची पार्श्वभूमी असल्यामुळे तपास यंत्रणेने या भागात रेकी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.