बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता. आणि अखेर त्यांचा राजीनामा घेण्यात आला. आता अन्न आणि नागरी पुरवठा या मंत्रीपदासाठी अनेक इच्छुकांची नाव समोर येत आहे.

राष्ट्रवादीच्या वाट्यातील मराठवाड्याच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांच्यासह विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांनी आपली वर्णी लागावी यासाठी पाऊले उचण्यास सुरुवात केली असल्याचं बोललं जातंय. मात्र सध्या तरी हे खात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याचं सांगितलं जातंय. यासंदर्भात राष्ट्रवादीमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, माजी क्रीडामंत्री संजय बनसोड हे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. भाजपमधील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. प्रकाश सोळंके हेही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचाही या पदासाठी दावा असू शकतो. राष्ट्रवादीचे लोह्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाही संधी मिळू शकते. रिक्त जागा भरताना मराठवाड्यातून वजा झालेले मंत्रिपद याच भागात राहावे, यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. यातील काही इच्छुकांनी अजित पवार यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे.

धनंजय मुंडे यांनी आजारपणाचे कारण दिले आहे. मंत्रिपदासाठी काही नावांची चर्चा सुरू झाली असली तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कार्यभार स्वत:कडे ठेवला आहे.