मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी गाजवणारा ‘चला हवा येऊ द्या’ फेम मराठमोळा अभिनेता सागर कारंडे आपल्या हटके आणि क्लासी विनोदीशैलीसाठी ओळखला जातो. पण, आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या सागर कारंडेवर आता रडण्याची वेळ आली आहे. सागर कारंडे सायबर क्राईमचा बळी ठरला आहे. मनोरंजन जगतात प्रसिद्ध असलेला सागर कारंडे एका महिलेच्या जाळ्यात अडकला असून ऑनलाईन फ्रॉडला बळी पडला आहे. सागर कारंडेला तब्बल 61 लाखांचा गंडा घातला आहे.
सागर कारंडेला एका महिलेनं व्हॉट्सॲपवर संपर्क केला, ज्यामध्ये त्याला इन्स्टाग्राम पेज लाईक केल्यानंतर पैसे मिळतील, असं आमीष दाखवलं गेलं. सुरुवातीला त्याला एका पेजला लाईक करण्यासाठी 150 रुपये देण्याचं आश्वासन दिलं गेलं. महिलेनं सागरला सुरुवातीला काही पेजच्या लिंक पाठवून त्याला लाईक करायला सांगितलं. सागरनं ते पेज लाईक केल्यानंतर त्याला त्याबदल्यात पैसे दिले गेले. पण, नंतर गुंतवणुकीची स्किम देऊन त्यात अडकवलं गेलं. आपली फसवणूक झाल्याचं समजताच सागर कारंडेनं तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची माहिती देताना लोकांना आवाहनही केलं आहे. अलिकडच्या काळात अशा ऑनलाईन घोटाळ्यांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे, त्यामुळे लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
तो सागर कारंडे मी नाहीच
यावर प्रतिक्रिया देताना मराठमोळा अभिनेता सागर कारंडे म्हणाला की, “मला त्या प्रकरणावर बोलायचं नाही, फेक आहे ते… त्याबद्दल नाही बोलायचं मला.” तसेच, याप्रकरणावर गुन्हा दाखल झाला आहे, असं विचारल्यावर सागर थोडासा वैतागूनच बोलला की, असू देत ना मग… सागर कारंडे एकच नाहीये खूप आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं, तर खूप दिसतील तुम्हाला. आपण कशाला लक्ष द्यायचं, प्रकरण खोटं आहे, माझ्यासोबत असं काही झालेलं नाही.”