वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात आता नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा छळ करणारा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, पती शशांक हगवणेबरोबरच सासू आणि नणंदेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र हगवणे कुटुंबाकडून केवळ वैष्णवीलाच नाही तर थोरला मुलगा सुशीलची पत्नी मयुरीचाही छळ करण्यात आला होता. यासंदर्भातील धक्कादायक माहिती मयुरीची आई लता जगताप आणि भाऊ मेघराज जगताप यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात समोर आली आहे. हे पत्र महिला आयोगाला ६ नोव्हेंबर २०२४ रोजी लिहिण्यात आलेलं. या पत्राचे फोटो आता समोर आले आहेत.
या पत्रामध्ये मयुरीची आई आणि भाऊ हे अर्जदार असून पत्राचा विषय ‘आमच्या मुलीस तिच्या सासरवडीतून होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण देणे बाबत’ असा आहे.
या पत्रात म्हटलंय की, माझी मुलगी सौ. मयुरी सुशील हगवणे हीचे २० मे २०२२ रोजी श्री सुशील राजेंद्र हगवणे राहणार भुकुम तालुका मुळशी याच्याशी विवाह झाला. त्यानंतर लग्नाच्या काही कालावधीनंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फॉरच्युनर पाहिजे व पैसे पाहिजे अशा मोठ्या गाड्यांच्या व रोख रकमेची मागणी करुन तिला त्रास देऊ लागले. तिचे पती घरी नसताना या घटना वारंवार घडत होत्या. नंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे दिर शशांक राजेंद्र हगवणे व नणंद करीश्मा राजेंद्र हगवणे यांनी तिला मारहाण करुन धमकी दिली, तुला वडील नाहीत तुझ्या अपंग भावास व आईस आम्ही मारुन टाकू. आमच्याकडे बंदुका आङेत. काही वाकड करु शकत नाही. माझा मेहुणा मोठा पोलिस अधिकारी आहे व आमच्या मागे मोठा राजकीय पाठींबा आहे. धमकी देऊन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा आम्ही घरगुती सामंजस्याने हे वाद मिटवत होतो. त्यानंतर १८/०२/२०२४ रोजी पौड पोलीस स्टेशन, तालुका मुळशी येथे तक्रार दाखल केली. परंतु त्यावेळी तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली. त्यानंतर सासू व सासरे तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करु लागले. तिच्या पतीचा या गोष्टीला नकार अशल्याने त्याचा राग हा मुलीवर काढत होते.
दिनांक ६/११/२०२४ रोजी तिचे पती घरी नसताना सासू, सासरे, दिर व नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले, मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला व दिराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली. तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये. या भाषेत मुलीला शिवीगाळ केला. हे सर्व होत असताना मुलीने मोबाईलमध्ये रेकॉर्डींग चालू केले होते. हे कळता तिचा दिर शशांक राजेंद्र हगवणे यांनी तिला मोबाईल हिसकाऊन पळ काढला व रस्त्याच्या दिशेने पळून गेला. व मुलगी मोबाईसाठी त्याच अवस्थेत त्याचा पाठलाग करत होती. ही घटना सदर ठिकाणाच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड सुद्धा झाली आहे. तिच्याकडे कोणलाही संपर्क करायचे साधन नसल्याने हतबल परीस्थीतमध्ये पोलिसात तक्रार दाखल करु शकत नव्हती. याचा फायदा घेत तीच्या सासु व नणं यांनी पोलीस स्टेशनला मुलीची तक्रा दिली व इतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अर्जात नमुद करता येऊ शकत नाही.आमची विनंती आहे आमच्या अर्जाची तात्काळ दखल घ्यावी व आमच्या असहाय्य कुटुंबास कायद्याद्वारे संरक्षण देऊन आमच्या मुलीस न्याय घ्यावा. ही नम्र विनंती.
आपली विश्वासू
लता जगताप