राज्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये नैराश्य अधिक असल्याचे दिसून आलं आहे. मानसिक आरोग्यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘टेलिमानस’ या हेल्पलाइनवर मदतीसाठी पुरुषांकडून येणारे कॉल महिलांच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात नैराश्येसंदर्भात समुपदेशन करणाऱ्या या हेल्पलाइनवर मदतीसाठी आलेल्या एकूण कॉल्सपैकी 67.99 टक्के कॉल पुरुषांनी केले आहेत. तर महिलांनी केलेल्या कॉलची टक्केवारी केवळ 31.50 टक्के इतकी आहे. 0.012 टक्का पारलिंगी व्यक्तींनीही या संपर्क केलेल्यांमध्ये समावेश आहे, असं विश्लेषणात नमूद करण्यात आलं आहे. आलेल्या कॉल्सपैकी 71 टक्के कॉल हे 18 ते 45 या वयोगटातील व्यक्तींचे आहेत. मदत, समुपदेशनासाठी विचारणा करण्यासाठी त्यांनी येथे संपर्क केला आहे.
नैराश्य, अस्वस्थता, चिंता, एकटेपणा, झोपेच्या तक्रारी यासाठी काय करावे, याबाबत विचारणा करण्यात आली. चिंता, ताणतणाव, नैराश्य, नातेसंबंध, कामाचा ताणतणाव, चिडचिडेपणा, एकटेपणा, वर्तणुकीतील बदल, झोप न येणे, अतिविचार, व्यसनाधीनता या समस्यांसाठी सर्वाधिक फोन येतात, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दहापैकी सात पुरुषांनी, तर तीन महिलांनी येथे मानसिक अनारोग्यासंबंधी मदत मागितली आहे. कामाच्या ठिकाणी असलेला ताण, बिघडलेल्या नातेसंबंधांच्या तक्रारी या प्रकरणांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे.