मासिक पाळीदरम्यान महिलांनी सॅनिटरी नॅपकिन्स वापरायला सुरूवात केल्यापासून महिलांना मासिक पाळीचा सामना करणे थोडे सोईस्कर झाले आहे. पण, सॅनिटरी नॅपकिन्समुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने महिला नवीन पर्यायाकडे वळताना दिसत आहेत. सॅनिटरी नॅपकिन्ससाठी पर्याय म्हणून मेंस्ट्रुअल कप हे महिलांसाठी एक मोठे परिवर्तन ठरले आहे. पण काही लोक, “या कप्सचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने मूत्रपिंडांना दुखापत होऊ शकते”, असा अंदाज लावत आहेत. हे खरे आहे का हे जाणून घेऊया.
मेंस्ट्रुअल कप योनीमार्गात चुकीच्या पद्धतीने ठेवल्याने मूत्रपिंडाला दुखापत होण्याची शक्यता असते. तसेच ती खूप वेदनादायकही असू शकते. परंतु, ही अत्यंत दुर्मीळ स्थिती आहे. मेंस्ट्रुअल कपची चुकीची स्थिती आणि संसर्गाचा धोका वाढल्यामुळे मूत्रपिंडाला दुखापत होऊ शकते.
तसेच मेंस्ट्रुअल कप चुकीच्या पद्धतीने योनीमार्गात वापरल्यास मूत्रमार्गावर (urethra) दीर्घकाळ दाब राहिल्याने, कालांतराने मूत्र टिकून राहण्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. मूत्रपिंडांवर वाढलेला हा दबाव शेवटी सर्वांत जास्त नुकसान करू शकतो. जर मेंस्ट्रुअल कप योग्यरीत्या स्वच्छ केला गेला नाही, तर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तो जास्त काळ आत ठेवल्यानेही मूत्रमार्गाच्या संसर्गाचा त्रास होऊ शकतो आणि जर त्याबाबत काळजी घेतली गेली नाही, तर मूत्रपिंडांसाठी आणखी वाईट स्थिती निर्माण होऊ शकते.
जरी टॉक्सिक शॉक सिंड्रोम (TSS) बहुतेकदा टॅम्पॉन्सशी संबंधित असतो. परंतु, जर ते योग्य रीतीनं वापरले नाहीत किंवा त्याबाबत योग्य ती देखभाल केली गेली नाही, तर तो त्रास मेंस्ट्रुअल कप वापरतानाही होऊ शकतो.