आज हिंदुत्वासाठी लढण्यासाठी काही लोकांना उभे रहावे लागते, याचे कारण हिंदूंची उदासीनता हेच आहे ! राजकारण आणि हिंदुत्व यांची सांगड घालणे योग्य नाही. छत्रपती शाहू महाराजांनी हातावर शिवलिंग कोरून घेतले होते. ते विचारांनी पुरोगामी आणि धर्माने हिंदु होते. त्यामुळे त्यांना पुरोगामी म्हणू नका. आमचा धर्म हिसकावू पहात असाल, तर ते शक्य नाही. आम्ही षड्यंत्रांना बळी पडतो. श्री. विक्रम भावे त्याचे उदाहरण आहे. त्यांनी केवळ हिंदुत्वाची कास धरली म्हणून त्यांना अटक केली. हे पुस्तक वाचल्यानंतर डॉ. दाभोलकर खटल्याला काही अर्थ नाही, वेगवेगळे आरोपी उभे करून खोटे कथानक उभे केल्याचे यातून लक्षात येते, असे परखड मत ‘आकार डिजी ९’ यू ट्यूबचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लब येथे २१ एप्रिल या दिवशी पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, आपण हिंदु म्हणून एकत्र येत नाही, तर जातीपातीत अडकलो आहोत. आपण जेव्हा हिंदू आहे, असे अभिमानाने सांगायला शिकू, तेव्हाच खर्या अर्थाने हिंदुत्वाला झळाली येईल. आपणही घराबाहेर जातांना भगवी टोपी, गंध लावून का बाहेर पडत नाही ? याउलट अन्य धर्मीय हे त्यांच्या धर्माची ओळख सांगणारे पोषाख घालतात.
या वेळी व्यासपिठावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई, ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी विक्रम भावे म्हणाले, माझ्या अटकेपासून ते सुटकेपर्यंत मी अनेक अनुभव घेतले आहेत. या अनुभवाचे हे पुस्तक आहे. माझी वाचकांना विनंती आहे की, या पुस्तकाकडे ‘विक्रम भावे’, असे व्यक्तीगत अनुभव म्हणून पाहू नका, तर एका हिंदुत्वनिष्ठाचे प्रातिनिधिक अनुभव म्हणून पहा, कारण आम्ही ‘जात्यात’ होतो; पण अजून कुणीतरी ‘सुपात’ असणारे आहेत. ते सुपातील जात्यात येतील, तेव्हा सुपात एक दिवस काहीच शिल्लक रहाणार नाही. या देशात हिंदुत्वनिष्ठ असणे म्हणजे अपराध आहे कि काय असे वाटण्यासारखे माझे हे अनुभव आहेत. माझी वाचकांना विनंती आहे की, हे पुस्तक वाचून अवश्य जागृती करावी. हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी कुणावरही विसंबून राहून चालणार नाही, तर आपल्यालाच कष्ट घ्यावे लागणार आहेत.
अन्वेषण करणार्या यंत्रणांकडून हिंदु विधीज्ञ परिषद, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीसह इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आतंकवादी संघटना म्हणण्याची समाजात प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. आझाद मैदानावरील दंगलीची हानीभरपाई, तसेच अनेक शेतकरी, प्लॉटधारक यांच्या लुबाडून घेतलेल्या भूमी हिंदु विधीज्ञ परिषदेने त्यांना परत मिळवून दिल्या आहेत. यासाठी आम्ही त्यांच्याकडून कोणतेही पैसे आकारले नाही. जो हिंदु धर्मासाठी लढतो, त्याच्यासाठी आम्ही सतत लढत रहाणार आहोत. हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहू, कारण तो हिंदुत्वासाठी कार्य करतो; म्हणून आमची ही भूमिका आहे. असे अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले.
तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रावसाहेब देसाई म्हणाले, हिंदुत्वाच्या कार्यासाठी ज्यांनी कारागृहवास पत्करून डगमगून न जाता त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारे पुस्तक केले हे विशेष आहे. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. आपण सर्वांनी हिंदुत्वाच्या कार्यात सतत कार्यरत राहिले पाहिजे. जगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. हिंदुत्वाचे कार्य करतांना पोलीस प्रशासन पूर्णपणे सहकार्य करत नाही, हे दुर्दैवी आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही देव, देश आणि धर्म यांचे कार्य करत आहोत.
यावेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सत्कार श्री. आनंदराव पोवार यांनी केला. श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांचा सत्कार अधिवक्ता योगेश जोशी यांनी केला, तर श्री. सुनील घनवट यांचा सत्कार अधिवक्ता संग्राम पाटील यांनी, तसेच श्री. विक्रम भावे यांचा सत्कार ‘सकल हिंदु समाजा’चे श्री. गजानन तोडकर यांनी केला.