राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. जयकुमार गोरे यांनी पीडित महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, असा दावा केला जात आहे. मंत्री जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप झाल्याने महायुती सरकारच्या यादीत आणखी एका कलंकित नेत्याची भर पडली आहे.
जयकुमार गोरे यांच्यावर महिलेने केलेल्या आरोपांचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत भाष्य केले. संजय राऊत यांनी म्हटले की, हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानी कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे, या संदर्भातली माहिती समोर आली आहे आणि ती महिला, ती अबला पुढच्या काही दिवसांमध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे, अशी ती बातमी आहे. जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. ही गोष्ट गंभीर आहे आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे महाराष्ट्र कलंकित होतोय, असे संजय राऊत म्हणाले.
एक पश्चिम महाराष्ट्रातला मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो. जेलमध्ये जाऊन येतो आणि मंत्री झाल्यावर तिच्या पाठी लागतो. पहिल्या महिला राष्ट्रपतींची जमीन लाटतो, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले.
आरोपांवर जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया
जे प्रकरण होते त्याचा 2019 साली निकाल लागला आहे. मी कोणतेही फोटो पाठवले नाहीत. कोर्टाने मला निर्दोष मुक्त केले आहे. जप्त केलेला मोबाईल नष्ट करण्याचा आदेशही कोर्टाने दिले आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाला ६ वर्षे झाली आहेत. आज ६ वर्षानंतर हा विषय समोर आला आहे. ज्यांनी आरोप केले. त्यांनी माझी बदनामी केली असून त्यासंबंधी हक्कभंग आणणार आहे तसेच अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांनी आरोपांवर खोडून काढत म्हटले की, माझ्या वडिलांचे सात दिवसांपूर्वी निधन झाले पण त्यांचे अस्थि विसर्जनही करु दिले नाही. एवढे खालच्या पातळीचे राजकारण विरोधकांनी करावे असे मला अपेक्षित नव्हते. मी जबाबदार पदावर काम करतो. मला विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देण्याची जबाबदारी आहे. या घटनेसंबंधी न्यायालयाने निकाल दिला आहे.