आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी काही महत्वाचे बदल केले आहेत. मनसेच्या केंद्रीय समितीची स्थापना करत मुंबई आणि ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आज राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी मनसेत काही नवीन पदांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच अमित ठाकरे यांच्यावर मनसेच्या सर्व शाखाध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.
“आम्ही एक केंद्रीय समिती नेमलेली आहे. ही केंद्रीय समिती प्रत्येक घटकांकडे बारकाईने लक्ष ठेवेल. या केंद्रीय समितीमध्ये पक्षातील काही नेत्यांची नियुक्ती केली आहे. या केंद्रीय समितीच्या गटाध्यक्षपदाची जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच नितीन सरदेसाई यांच्याकडे विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक लोक आहेत. अशाच प्रकारची रचना ठाणे शहरात देखील केलेली आहे. ठाण्यात देखील केंद्रीय समिती केली आहे. या समितीत अविनाश जाधव हे एक जबाबदारी पाहतील, अभिजीत पानसे हे एक जबाबदारी पाहतील तसेच राजू पाटील हे एक जबाबदारी पाहतील”, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.