संभाव्य ठाकरे युतीआधी एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का!

भविष्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले तर त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर खास करुन मुंबई आणि उपनगरांमधील पालिका निवडणुकींवर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसेल अशीही चर्चाही सुरु आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींदरम्यान मुंबईत एकनाथ शिंदेंनी आता राज ठाकरेंना धक्का देण्यास सुरूवात केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेच्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु झाले असून याच मोहिमेचा पहिला भाग म्हणून आज अंधेरीत मोठा पक्षप्रवेश सोहळा होत आहे. मनसेचे पवईतील माजी नगरसेवक अविनाश सावंत हे शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी अंधेरीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्याही एकत्र येण्याची  शक्यता निर्माण झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आता राज ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनाही पक्षात घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नेमकं काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here