भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना केल्यानंतर मनसेनं या टीकेला जशास तसं उत्तर दिलं आहे. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी शेलक्या शब्दांमध्ये टीका केल्यानंतर मनसेनं या टीकेला उत्तर दिलं आहे.
आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसेचे नेते योगेश चिले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपाला लाज वाटली पाहिजे असं म्हटलंय. “या गोष्टीची भाजपावाल्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही भाषेसंदर्भातील हा वाद उकरुन काढला. आम्ही फक्त या महाराष्ट्राची भाषा मराठीचा आदर राखला गेला पाहिजे, इतकंच सांगत होतो. त्यावर कोणी उद्दामपणा केला असेल तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. आमची तुलना दहशतवाद्यांबरोबर केली जात असेल तर भाजपामध्ये असलेल्या मराठी लोकांनी विचार केला पाहिजे की आपण कुठल्या लोकांना साथ देत आहोत. ज्या महाराष्ट्राने या देशासाठी आपलं रक्त सांडलं. त्या महाराष्ट्रातील एका पक्षातील तरुणांना तुम्ही आज दहशतवादी ठरवायला चालला आहात. यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही.”