मीरा रोड-भाईंदरमध्ये शिवसेना मनसेचा यशस्वी मोर्चा

मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चाच्यानिमित्ताने मंगळवारी मुंबईतील राजकीय वातावरण अनेक दिवसांनी तापलेले पहायला मिळाले. राज-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मेळाव्यानंतर मंगळवारी प्रथमच ठाकरे आणि मनसे गटाने एकत्र आंदोलन केले. सुरुवातीला मीरा-भाईंदरमधील या मोर्चाला परवानगी नाकारुन पोलिसांनी ठाकरे गट आणि मनसेच्या हातात आयते कोलीत दिले. त्यानंतर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांमध्ये या मराठी मोर्चाच्या भूमिकेवरुन प्रचंड विसंवाद दिसून आला. शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांनी थेट सरकार आणि पोलिसांच्या विरोधात भूमिका घेत मोर्चात सामील होण्याची घोषणा केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बाजू कशी योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सगळ्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाला मीरा-भाईंदरमध्ये अनुकूल असा राजकीय पीच उपलब्ध झाला. त्याचा पुरेपूर वापरत करत मनसे आणि ठाकरे गटाने मराठी एकीकरण समितीच्या साहाय्याने मीरा-भाईंदरमध्ये मोठे आंदोलन केले.

सुरुवातीला पोलिसांनी मीरा रोडमधील बालाजी हॉटेल चौक परिसरातून मोर्चा काढण्यास मज्जाव केला होता. मात्र, दोन तासांनी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड थांबवली आणि ते आक्रमक भूमिकेतून एकदम कोशात गेले. त्यामुळे मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीने बालाजी हॉटेल चौकातून मोर्चा काढला. हा मोर्चा शांतीनगर परिसरातून जाणार होता. हा परिसर गुजराती आणि जैनबहुल लोकसंख्येचा आहे. केवळ येथून जाण्यासाठी मोर्चाला मज्जाव करण्यात आला. यानंतर हा मराठी मोर्चा मजल दरमजल करत मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोहोचला. याठिकाणी आंदोलकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मोर्चा मीरा रोड स्थानकापर्यंत पोहोचल्यानंतर त्याठिकाणी ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई दाखल झाले. या सगळ्या नेत्यांनी येथील ट्रकच्या मागच्या भागात उभे राहून जोरदार भाषणे केली. राजन विचारे, संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या भाषणाला मनसे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here