भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई करत यशस्वीपणे राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मिशनवर आता एक चित्रपट तयार होणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा नुकतीच झाली असून, त्याचे पहिलं पोस्टर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
पोस्टरमध्ये एक महिला सैनिक मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या कपाळावर कुंकू लावताना दिसते आणि तिच्या दुसऱ्या हातात बंदूक आहे. हे पोस्टर देशभक्ती, सामर्थ्य आणि नारीशक्ती यांचे प्रतीक मानले जात आहे. विशेष म्हणजे, पोस्टरमध्ये त्या महिलेचा चेहरा अस्पष्ट ठेवण्यात आला आहे, त्यामुळे ही भूमिका कोण साकारत आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाचे काम ‘निक्की विकी भगनानी फिल्म्स’ आणि ‘द कंटेंट इंजिनिअर’ करणार आहेत. तर त्याचे दिग्दर्शन उत्तम-नितीन या दिग्दर्शक जोडीने केले आहे. यापूर्वीही या जोडीने देशभक्तीवर आधारित काही लघुपट आणि वेब प्रोजेक्ट्समध्ये काम केलं असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्याकडून अधिक वास्तविक मांडणीची अपेक्षा आहे. चित्रपटाचे संगीत, पार्श्वसंगीत आणि सिनेमॅटोग्राफी यासाठी आघाडीच्या कलाकारांची निवड करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूरवर आधारित या चित्रपटाचे पोस्टर मानव मंगलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. पण काही वेळानंतर ते हटवण्यात देखील आले.