मुंबईच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी, तसेच पर्यावरण संतुलनासाठी महानगरपालिका प्रशासनाने कुर्ला, पवई, बोरिवली येथील तब्बल ४ एकर भूखंडावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या भूखंडावर सुमारे ३.५ हजार झाडांचे पारंपरिक पद्धतीने रोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
मुंबईत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका पर्यावरणाला बसत आहे. मध्यंतरी मुंबईत बांधकामामुळे प्रदूषणात वाढ झाली होती. त्यामुळे काही दिवस बांधकाम बंद ठेवण्यात आले होते. विकासकामांआड येणाऱ्या अनेक झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. वृक्षसंपदेत वाढ व्हावी यादृष्टीने गतवर्षी जुलै महिन्यात मुंबईतील तीन मोठ्या भूखंडांवर वृक्षलागवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी कुर्ल्यातील चांदिवली, पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी वृक्षलागवडीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार आता लवकरच महापालिकेच्या उद्यान खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत तब्बल ४ एकर भूखंडावर पारंपरिक पद्धतीने ३.५ हजार झाडांचे रोपण करण्यात येणार आहे.
वृक्षलागवडीचे काम तीन महिन्यात पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे. वृक्षलागवड आणि झाडांच्या सुरुवातीच्या देखभालीची सर्व जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली असून दोन वर्षांनंतर या झाडांची देखभाल महापालिकेच्या उद्यान खात्यामार्फत केली जाणार आहे. महापालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर या भूखंडांवर हरित क्षेत्र विकसित होणार आहे. परिणामी, पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल.