भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण करणाऱ्या ३ आरोपींवर मकोका लावण्यात आला असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसंच आरोपी ज्या मारणे टोळीशी संबंधित आहेत त्या टोळीचा प्रमुख गजा मारणे याच्यावरही कारवाई करणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. पुणे पोलिसांची ही कारवाई मारणे टोळीसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
कारवाईविषयी माहिती देताना अमितेश कुमार म्हणाले की, “मारहाण करणाऱ्या तिघांवर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीला नेस्तनाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे. एकूण २७ आरोपी आमच्या रडारवर आहेत. टोळीप्रमुखावरही कारवाई केली जाईल. कोणीही कायदा हातात घेऊ नका. त्या टोळीतील सदस्यांच्या मालमत्तांची माहिती डीडीआरकडून आणि त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओकडून मागवली आहे,” असं कुमार यांनी सांगितलं आहे.
पुणे शहरात बुधवारी सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर चौकात मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारणेच्या गुंडांकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय ३५, शिंदे चाळ, संजय चौक, शास्त्रीनगर, कोथरूड), किरण कोंडिबा पडवळ ( वय ३१ , शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरूड) आणि अमोल विनायक तापकीर (वय ३५, रा. लालबहाद्दूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी त्यांची नावे आहेत.
“मारहाण झालेला तरुण भाजपचा कार्यकर्ता आहे. मात्र, कार्यकर्ता म्हणून नव्हे तर पुण्यातील प्रत्येक तरुण किंवा नागरिकावर पोलिसांची कडक भूमिका पाहिजे. माझ्या पुणे शहराचे नाव अशा पद्धतीने खराब होत असेल तर ते चालून देणार नाही. शहरातील हे सगळे थांबले पाहिजे, अन्यथा आमच्या पद्धतीने आम्ही काम करू,” अशा शब्दांत पुण्यातील या घटनेवर मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला.