म्यानमारमध्ये शुक्रवारी 28 मार्च रोजी 7.7 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला. या विनाशकारी भूकंपामुळे मृतांची संख्या 2 हजार 56 वर पोहचली आहे. तसेच 3 हजार 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सुमारे 270 लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती सरकारने दिली आहे. 7.7 रिश्ट स्केल तीव्रतेचा या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे. सध्या बचावकार्य जोरात सुरु असन मलब्याखाली अडकलेल्या लोकांना वाचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. भूकंप केंद्र मांडले शहराच्या जवळ असल्याने यामुळे थायलंडसह अनेक शेजारील देशांमध्येही या भूकंपाचा धक्का जाणवला आहे. थायलंडची राजधानी बँकॉक आणि इतर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भयानक आपत्तीमुळे सरकारने एका आठवड्यासाठी राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा जाहीर केली आहे.

भारतासह अनेक देश आणि संयुक्त राष्ट्र (UN) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी बचाव पथके जागतिक पातळीवर कार्य करत आहेत. नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य केले जात आहे.

भारताने ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले असून, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी यांगूनला मदत सामग्री पोहोचवली आहे. यात अन्नधान्य, औषधे आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी आवश्यक सामग्रीचा समावेश आहे.