नागपूर शहरात काल रात्री मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन वातावरण तापलं. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. वाहनांना आगी लावल्या. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला आहे. त्यावरुन हा सर्व राडा झाला. काल विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावर आंदोलन केलं. नागपूरच्या महाल भागात अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेक करणाऱ्यांना रोखताना पोलीसही जखमी झाले. दगडफेकीच्या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले. जमावाने तिथे असलेला जेसीबी पेटवून दिला.

नागपूर शहरात आज तणावपूर्ण शांतता आहे. आता महाल भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचवेळी संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शांतता बाळगण्याच आवाहन केलं आहे. पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल ते अत्यंत गांर्भाीयने घेतलं जाईल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूरमध्ये पोलिसांनी कलम 163 लागू केलं आहे. पाचपेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी आहे.
कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सककरदरा, नंदनवदन, इमामवाडा, यशोधरानगर,कपीलनगर या भागात संचारबंदी आहे.