सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांनाही सहआरोपी करणार – फडणवीस

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादादरम्यान सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. रात्रीच्या सुमारास हिंसक संघर्ष झाला होता. यावेळी दगडफेक, वाहनांची तोडफोड, जाळपोळ असे प्रकार घडले होते.यामुळे तणावाचे वातावरण होत, बरीच खळबळही माजली. या हिसांचारानंतर नागपूरमध्ये अनेक भागांत संचारबंदी लावण्यात आली असून अजूनही काही भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी संपूर्ण घटनेसंदर्भात पुन्हा माहिती दिली. कबर जाळत असताना कुराणचे आयत लिहिलेली चादर जाळली असा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियातून अपप्रचार केला. सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी म्हणून पोस्ट केल्या त्यांना दंगेखोरांच्यासोबत सहआरोपी करणार आहे. त्यांनी दंगा भडकवला. 68 पोस्ट आयडेंटिफाय होऊन डीलिट झाल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अजून काही पोस्टची माहिती घेतली जात आहे. ज्यांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवली त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. आतापर्यंत 104 लोकांना अटक केली आहे. त्यात 92 लोक आहेत आणि 12 लहान मुलं आहेत. जोपर्यंत शेवटच्या दंगेखोराला पकडलं जात नाही तोपर्यंत अटक सत्र सुरू राहील.
जोपर्यंत दंगलखोरांना धडा शिकवत नाही, तोपर्यंत कारवाई सुरू राहील. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा देणार आहे,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here