नागपूर दंगलीत बाहेरच्या लोकांचा हात असल्याचा संशय, सायबर पोलिसांची माहिती

नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीप्रकरणी जवळपास तीनशेहून अधिक सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी करण्यात आल्याचे नागपूर सायबर क्राईमचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितले. यामध्ये १४० अकाऊंटवर आक्षपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ आढळून आले असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले.

लोहित मतानी म्हणाले की, नागपूर दंगलीप्रकरणात नागपूरच्या बाहेरच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला गेला. दंगलीचे समर्थन काही पोस्टमध्ये करण्यात आलेले आहे. या अकाऊंटची तपासणी सुरू असून ते देशाबाहेरचे आहेत का? याचीही तपासणी केली जात आहे. याचबरोबर दंगलीचा मुख्य आरोपी फहीम खान याच्याही सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी करण्यात आली आहे. त्याच्या खात्यावरही आक्षेपार्ह मजकूर आढळला असून सायबर विभागाने त्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

मतानी यांनी पुढे सांगितले की, गुन्हे क्र. ३०/२५ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या विरोधात जो हिंसाचार झाला, त्याचे समर्थन करून काही जणांनी याची स्तुती केली. या हल्ल्याचे समर्थन करताना काही कमेंट केल्या गेल्या, ज्यामुळे दंगलीला आणखी हवा मिळाली. ज्या लोकांनी अशा कमेंट केल्या त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीम खानसह सहा जणांवर सध्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून त्यात आणखी वाढ होऊ शकते, असेही मतानी यांनी सांगितले.

नागपूर दंगलीमागे बांगलादेशचा हात आहे का? असाही प्रश्न पत्रकार परिषदेत लोहित मतानी यांना विचारला गेला. त्यावर ते म्हणाले की, बांगलादेशच्या अँगलचा तपास केला जात आहे. एखाद्याने पोस्टमध्ये बांगलादेश लिहिले म्हणजे बांगलादेशचा संबंध लावता येत नाही. त्यासाठी सखोल तपास करावा लागेल. नागपूर दंगलीप्रकरणी आतापर्यंत चार एफआयआर दाखल केले असून त्यात ५० हून अधिक आरोप आहेत. आणखीही काही एफआयआर दाखल केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here