नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटेना! महायुतीत अस्वस्थता वाढली

विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी वाशीमच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकसह रायगडचे भिजत घोंगडे कायम ठेवले आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदावरील गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती देऊन सव्वादोन महिने लोटले, तरी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे पाच दिवस उरले असताना, तसेच सिंहस्थाचे नियोजन रखडले असतानाही पालकमंत्रिपदाचा फैसला होत नसल्याने नाशिकमधील लोकप्रतिनिधींसह नाशिककरांमधील अस्वस्थता वाढली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदांवरून महायुतीत गेल्या सव्वादोन महिन्यांपासून ओढाताण सुरू आहे.


भुसेंऐवजी भाजपचे नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपद दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला चोवीस तासांतच स्थगिती दिली होती. त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादी अजित पवार गटासह शिवसेना शिंदे गटाकडून दावा केला गेला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दत्तात्रय भरणे यांची वाशिमच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे वाशिमचा तिढा सुटला खरा. परंतु, रायगडसह नाशिकचा विषय प्रलंबित राहिल्याने प्रशासकीय पातळीवर निराशा, तर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here