एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे चर्चेत आले होते. या प्रकरणात गोरे यांना कोर्टाकडून दिलासा देखील मिळाला होता. मात्र त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटकेची कारवाई केली. खंडणी घेताना पोलिसांनी महिलेला अटक केली होती. या प्रकरणात एका युट्यूबवरील पत्रकाराला देखील अटक करण्यात आली. या सगळ्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जयकुमार गोरेंसंदर्भात तक्रारी करण्यात आल्या. पहिली तक्रार जयकुमार गोरे यांनी केली होती. दुसरी तक्रार विराज शिंदे यांनी केली. तिसरी तक्रार उमेश मोहिते यांनी केली. या प्रकरणात जी महिला आहे ती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे अशा प्रकारचा खोटा प्रचार करण्यात आला. त्या विरोधात ही तक्रार होती. या प्रकरणातील लोकांना अटक झाली आहे. यामध्ये ती महिला, तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांचा समावेश आहे. या सगळ्यांनी मिळून जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यामध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक यांच्याशी थेट संपर्कात होते. हे मी पुराव्यानिशी सांगतो. प्रभाकरराव देशमुख हे या तिन्ही आरोपींशी १०० वेळा बोलले आहेत. तुषार खरात यांनी जयकुमार गोरेंविरोधात तयार केलेले व्हिडिओ सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.