सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून सतत होणाऱ्या विविध आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. जाणीवपूर्वक केलेल्या बदनामीकारक आरोपांबद्दल दमानिया यांच्याविरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही दमानिया यांना आक्रमक इशारा दिला आहे.
“धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर २५ खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला १५ देश फिरणाऱ्या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू,” असा इशारा सूरज चव्हाण यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.