गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, अशी चर्चा आहे. मात्र आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून पवार गटात उघड-उघड दोन गट पडल्याचं दिसत आहे. ही संभ्रमावस्था एकदाची संपवून टाकावी असं जाहीर आवाहन कार्यकर्त्यांनी केल आहे. तर, एका प्रवक्तत्यांनी विलीनीकरणासाठी थेट सुप्रिया सुळे यांनाच पत्र लिहिले आहे.
राष्ट्रवादीतील दोन गटांच्या विलीनीकरणाची बातमी थेट मोठ्या पवारांनीच फोडल्याने त्यांच्या पक्षातील पुरोगामी कार्यकर्त्यांमंध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. जितेंद्र आव्हाड, प्रशांत जगतापांसारखी मंडळी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. तर अनेक कार्यकर्ते यावर लवकर निर्णय घेण्याची मागणी करत आहेत. विकास लवांडे यांनी पवार कुटुंबाने ही संभ्रमावस्था संपवावी असं थेट आवाहनच केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांच्या भाषणादरम्यान दोघांत संवादही झाला. त्यामुळे एकत्रिकरणाच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे. शरद पवार खरंतर पुरोगामी विचारांचे पाईक मानले जातात. किंबहुना त्यासाठीच ते अजितदादांसोबत सत्तेत गेलेले नाहीत. मात्र, आता पक्षातलाच एक मोठा गट सत्तेसाठी अजितदादांसोबत जाण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रकारे दबाव टाकू लागलाय. त्यामुळे शरद पवारांनी याबाबतचा निर्णय थेट सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात ढकलून दिला आहे. आगामी पक्ष बैठकीत विचारधारा तग धरतेय की सत्ता जिंकतेय हेच पाहायला मिळेल.