सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट, मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं. डॉ. वळसंगकर यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापूरमधील स्वतःच्या निवासस्थानी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी दोन गोळ्या डोक्यात झाडून घेतल्या, असल्याची माहिती आता समोर येत आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूरमध्ये मेंदू रोग रुग्णांसाठी मोठं रुग्णालय सुरू केले होते. डॉ. वळसंगकर हे सोलापुरातील पहिले न्यूरॉलॉजिस्ट होते. डॉ. वळसंगकर यांनी मेंदूवर विविध आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय सुरू केलं होतं. शहराच्या रामवाडी परिसरात असलेल्या वळसंगकर रुग्णालयाने अनेक मेंदूरोग रुग्णांना जीवनदान दिलं आहे. सोलापूरमध्ये न्यूरॉलॉजी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. शिरीष वळसंगकर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल का उचललं, याची माहिती अद्याप समोर आली नाही. घरगुती कारणांमुळे डॉ शिरीष वळसंगकर यांनी अनेक दिवसांपासून प्रॅक्टिस कमी केली होती. त्यांची प्रॅक्टिस कमी झाली असतानाच त्यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता पोलिस त्यादृष्टीने तपास करणार असल्याचे म्हटले जात आहे.