महाराष्ट्रात आणखी एक धरण पूर्णत्वास येत आहे. या धरणामुळं तीन शहरांना पाणीपुरवठा होणार आहे. या प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहरजी नदीवर हा प्रकल्प आहे. माती व दगडांचा वापर करून हे धरण बांधण्यात येत असून या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी ९३.२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन २५५ दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केआयडीसी व एममएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारानुसार एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी २५९९.१५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. केआयडीसीने २७ जुलै, २००६ रोजी मे. पीव्हीआर प्रोजेक्ट्स लि. यांच्याशी प्रकल्प अंमलबजावणीचा करार केला आणि या धरणाद्वारे व्यापक पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीचा सखोल प्रकल्प अहवाल एमएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत आहे.