सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये मनीषा माने या महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी मनीषा माने यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिला कामावरून काढल्याने आरोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता मनीषा मानेचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
मनीषा माने या २००८ पासून वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. सध्या त्या एओ म्हणजेच विशेष अधिकारी म्हणून काम करत होत्या. १७ एप्रिल रोजी मनीषा यांनी डॉ.वळसंगकर यांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये पगार कपात होत आहे असा एक मेल पाठवल्याचं सांगितलं जात आहे. माझ्याबद्दल काही वाईट सांगितले जात आहे. माझ्यावर आरोप होत आहेत. माझी बदनामी होत आहे. ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करते, असा मेल त्यांनी डॉक्टरांना पाठवला होता. 17 तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलला बोलवून घेतले. तेव्हा या महिलेने डॉक्टरांची माफी मागितली होती. माफी मागितल्यानंतर डॉक्टरांनी संध्याकाळी घरी जाऊन रिवाल्वर मधून गोळ्या घालून आत्महत्या केली, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. शिरीष वळसंगकरांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासायला पाठवायचे असल्याचं पोलिसांनी कोर्टासमोर या चिठ्ठीबद्दल बोलताना सांगितलं.