परप्रांतीय तरुणीची मराठी भाषिकावर अरेरावी, ‘ नहीं है मराठीइम्पॉर्टन्ट’! काय घडलं वाचा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतला मराठी भाषिकांचा मुद्दा वारंवार समोर येत आहे. अनेक ठिकाणी परप्रांतीयांकडून मराठी भाषिकाला मारहाण, नोकरी न देणं, अरेरावी करणं अशा बातम्या सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली.

मुंबईच्या चारकोपमधील एअरटेलच्या गॅलरीत कर्मचारी तरुणीचा मराठीतून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठी येणं गरजेचं नाही, अशी उद्दाम भाषा तरूणीची दिसून येत आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठीतून बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरूणाशी तरूणी हुज्जत घालत असल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे.

नेमकं काय घडलं?

एक मराठी तरुण चारकोपच्या एअरटेल गॅलरीत गेला होता. तिथे असलेल्या परप्रांतीय तरुणीने मराठी बोलण्यावरून हुज्जत घातली. ‘क्यू मराठी आना चाहिए? कहा लिखा हुआ है. तुमने महाराष्ट्र खरीदके रखा है क्या? असा उद्दाम सवाल तिने मराठी तरुणाला केला. आणि पोलिसांची धमकी दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एअरटेलच्या गॅलरीत तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने मराठी बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तेथील तरुणीने मराठी बोलण्यास नकार देत हुज्जत घातली. तिच्या या अरेरावीवर अनेकांनी संताप व्यक्त केला. तिला महाराष्ट्रातून हाकलून द्या अशा कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळताय.

ठाकरे गट आक्रमक

हे प्रकरण समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे थेट एअरटेलच्या गॅलरीत पोहचले. एअरटेलच्या गॅलरीत मराठी तरुण-तरुणी ठेवायला अडचण आहे काय?, असा सवाल अखिल चित्रेंनी उपस्थित केला. तसेच मुंबईतील एअरटेलटच्या कामकाजात मराठी नसेल, तर एकही एअरटेलची गॅलरी दिसणार नाही, असा इशारा अखिल चित्र यांनी दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद वाढताना दिसत आहे. एअरटेल प्रशासनाने नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावं. महाराष्ट्रात एअरटेलचे असंख्य मराठी ग्राहक आहेत ते कायम ठेवायचे असतील तर योग्य पाउलं उचला नाहीतर मुंबईत एअरटेल ची गॅलरी दिसणार नाही. इतर भाषेचा विरोध नाही पण मराठी भाषिक 80% कर्मचारी असायलाच हवे, असं अखिल चित्रे म्हणाले. एअरटेल प्रशासनाने ताबडतोब या अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही कारवाई केली तर मुंबईत ए‌अरटेल गॅलरी दिसणार नाहीत, महाराष्ट्रात आपली ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणात आहेत, ते संख्या जर कायम ठेवायची असेल तर मराठी भाषेचा मान राखा, असंही अखिल चित्रे यांनी एअरटेलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहित सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here